कोणी एक यक्ष – रसभारती – २

कश्चित्कान्ताविरहगुरुणा स्वाधिकारात्प्रमत्तः
शापेनास्तङ्गमितमहिमा वर्षभोग्येण भर्तु: |
यक्षचक्रे जनकतनयास्नानपुण्योदकेषु
स्निग्धच्छायातरुषु वसतिं रामगिर्याश्रमेषु ||१||

मेघदूतातील वरील श्लोकातला पहिला शब्द “कश्चित” फार महत्त्वाचा आहे. कोणी एक यक्ष. कालिदासाने यक्षाचा नामनिर्देश केलेला नाही. स्वतः कालिदासाबद्दलदेखील ऐतिहासिक तथ्य म्हणता येईल अशी माहिती उपलब्ध नाही. आणि त्यामुळेच कदाचित, कालिदासाची जात, पात, प्रान्त न पाहता त्याच्या निखळ साहित्याचेच परिशीलन झाले. काव्यातले पात्र असे अनामिक ठेवण्यामागे हे महत्त्वाचे कारण असावे.

जर या यक्षाचे नाव गाव माहित झाले असते तर लोकांनी त्यावरून काही आडाखे बांधण्यास सुरुवात केली असती. जरी यक्षकथा बर्‍याच जणांना माहित असली तरी कालिदासाने ती मेघदूतात सांगितली नाही. या पार्श्वभूमिला फारसे महत्त्व न देता सरळ विषयाकडे हे काव्य येते. त्यामुळे रसिकांना इतर ठिकाणी पाहण्यास काही वाव मिळत नाही. हे सर्व एका “कश्चित” शब्दामुळे घडले आहे.

नावगाव माहित झाल्यास, किंवा त्या संदर्भातील कथा सविस्तर दिल्यास मुख्य विषयाच्या रसनिष्पत्तीमध्ये अडथळा येण्याचा संभव महाकवीने ओळखला असावा. कालिदासाच्या एकेका शब्दामागे अशातर्‍हेचा खुपच विचार केलेला आढळतो. आज तरी मला इतकेच जाणवले आहे. अनेकांना याहून खोल काही जाणवेल. सतत जास्तीत जास्त खोलात जाऊन ही रत्ने शोधण्यात मौज आहे.

अतुल ठाकुर

You can follow any responses to this entry through the RSS 2.0 feed. You can leave a response, or trackback from your own site.

Leave a Reply

Your email address will not be published.