Archive for the Category » History «

लोकमान्य टिळक, मंडाले आणि गीतारहस्य

लोकमान्य टिळक, मंडाले आणि गीतारहस्य

“ज्युरींचा निर्णय विरुध्द असला तरी मी निरपराध असल्याबद्दल माझे मत कायम आहे. वस्तुमात्राच्या भवितव्याचे नियंत्रण करणारी (याहून निराळी) उच्च सामर्थे आहेत. मी मोकळा राहाण्यापेक्षा माझ्या कार्याचा उत्कर्ष माझ्या क्लेशांनी व्हावा, अशीच कदाचित ईश्वराची इच्छा असावी.”

टिळकांच्या वाणीतुन स्फुरलेल्या या उद्गारांनंतर न्यायाधीशाने त्यांना सहा वर्षाची सक्तमजूरी, हद्दपारी आणि हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. यापैकी सक्तमजूरी व दंड ही नंतर रद्द झाली. शिक्षा भोगण्यासाठी टिळक मंडालेला आले तेव्हा त्यांची पन्नाशी उलटुन गेली होती. जुन्या व्याधी सतत त्रास देत होत्या. त्यापैकी सर्वात गंभीर मधुमेह त्यांनी आहारावर संयम करुन ताब्यात ठेवला होता. त्याचवेळी त्यांना व्यक्तिगत जीवनातील अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. मुलांची शिक्षणं, पत्नीचा मधुमेह यासारख्या अनेक गोष्टींची त्यांना चिंता वाटत असे.

स्वदेशापासुन दूर, व्याधिंनी पोखरलेलं शरीर आणि चिंतेने होरपळणारं मन घेउन टिळकांनी मंडालेला ज्या कार्याचासंकल्प सोडला तो पाहता त्यांची असामान्य जिद्द प्रत्ययास येते. हा संकल्प म्हणजे भगवद्गीतेवरील भाष्य. वडीलांच्या अखेरच्या समयी त्यांना गीता ऐकवीत असताना टिळक या विषयाकडे ओढले गेले. पुढे स्वतंत्रपणे, इतर मतमतांतरे आणि टीकांचा गलबला बाजुला सारुन गीतेचा अभ्यास करताना गीता ही निवृत्तीपर नसुन कर्मयोगपर आहे या निर्णयाला ते आले. किंबहुना तसा त्यांचा पक्का निश्चय झाला. श्रीभगवद्गीतारहस्य हे त्याचेच फलित आहे.

भारतीय असंतोषाचे जनक म्हणून ओळखल्या गेलेल्या टिळ्कांनी बराच काळ डोक्यात घोळत असलेला गीतेवरील सांगोपांग टीका लिहीण्याचा बेत या कारावासामुळे मिळालेल्या सक्तीच्या विश्रांतीत पार पाडण्याचं ठरवलं. कारावासापुर्वीच टिळकांची याविषयीची तयारी सुरु होती. राजकीय चळवळीची कामे सांभाळुन त्यांनी आपला अभ्यास चालवला होता. कारावासात मोकळा वेळ मिळताच टिळकांनी संपुर्ण ग्रंथ फक्त साडेतीन महीन्यात लिहुन काढला. जवळ लेखनिक नाही. स्वतःचं समृद्ध ग्रंथालय दूर पुण्याला. अशासारख्या अडचणींना टिळकांनी जुमानलं नाही. योगायोगाची गोष्ट ही की भगवद्गीतेवरील  विसाव्या शतकातील सर्वात महत्त्वाचे भाष्य म्हटले गेलेल्या गीतारहस्याचा जन्म भगवान श्रीकृष्णाप्रमाणेच कारावासात झाला.

सुटका झाल्यावर टिळकांनी ग्रंथ प्रकाशित केला. शंकराचार्यांच्या अभिमान्यांकडून त्यांना प्रखर टीकेला तोंड द्यावे लागले. गीता कर्मपर नसुन संन्यासपर आहे असे प्रतिपादन करणार्‍यांचा हा गट होता. आचार्यांचे मत खंडन करण्याचं धारिष्ट्य दाखवणार्‍या टिळकांवर सनातन्यांनी टिकेची झोड उठवली. परंतु असामान्य बुद्धीमत्तेचे टिळक वादविवादात सर्वांना पुरून उरले. आज गीतारहस्य हा ग्रंथ भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील कधीही पराभूत न झालेल्या या नेत्याचं सर्वोच्च प्रतिक बनला आहे

अतुल ठाकुर

संदर्भ: “लोकमान्य” – न. र.फाटक