Archive for the Category » Hollywood «

भारतीय अध्यात्म आणि मेट्रीक्स

भारतीय अध्यात्म आणि मेट्रीक्स

मेट्रीक्स चित्रपट पाहताना पौर्वात्य मनाला ओळखिचे काहीतरी जाणवत असते. त्यातही आपण भारतीय मंडळी तर पटकन आपल्या अध्यात्मातील दाखले देऊन चित्रपटाशी असलेले भारतीय तत्वज्ञानाचे साम्य दाखवु लागतो. साम्य पाहायला गेले तर आहेच यात शंका नाही. मात्र ते पाहताना विरोध कुठे आहे याकडे लक्ष दिले पाहिजे तरच या विषयाचा नीट मागोवा घेतल्यासारखे होईल. साम्य पाहण्याच्या नादात विरोधाकडे बहुतेकांचे संपुर्ण दुर्लक्ष झालेले दिसते. या लेखात साम्य व विरोध या दोन्हींचा परामर्ष घेण्याचा विचार आहे.

निओ हा एक सर्वसाधारण घोळक्यापेक्षा वेगळा तरुण ज्याला या जगात कुठेतरी काहीतरी चुकते आहे याची जाणीव आहे. आणि त्यासाठी या जगाचे मुळ काय याच्या शोधात तो आहे. त्याला मॉर्फियस भेटतो. तो त्याचा गुरु बनुन त्याला जगाचे जे मूळ “मेट्रीक्स” त्याचे दर्शन घडवतो. हे करतानाच मॉर्फियसची अशी श्रद्धा आहे की निओ हाच जगाचा भविष्यातील तारणहार आहे. मॉर्फियसच्या मार्गदर्शनाखाली निओचे शिक्षण सुरु होते. पुढे प्रसंगवशात निओला आपल्यातील ताकदीची जाणीव होते. तो यंत्रांशी, ज्यांच्या ताब्यात आजचे जग आहे, युद्ध करतो आणि जगाचा सर्वनाश टाळतो. हे करत असतानाच मॉर्फियसकडे असलेल्या ट्रीनिटी या त्याच्या स्त्री सहकारीचे निओवर प्रेम जडते. दोघे मिळुन यंत्राशी शेवटचे युद्ध खेळतात आणि जिंकतात. मी सांगितलेला कथेचा गोषवारा त्रोटक आहे. तो पुरेसा नाही याची मला जाणीव आहे. तरीही ज्या विषयाचे विवेचन करायचे आहे त्यासाठी इतपत उल्लेख पुरे आहे असे मला वाटते.

आपले अध्यात्म यावर काय म्हणेल? निओ हा मोक्षेच्छु तरुण आहे. जगाचे कारण काय या आदिम प्रश्नाच्या शोधात आहे. गुरुशिवाय ज्ञान नाही. जोपर्यंत निओची तयारी होत नाही मॉर्फियस त्याला भेटतच नाही. शिष्याची पुरेशी तयारी झाल्यावर गुरु आपोआप भेटावा त्याप्रमाणे निओची मॉर्फियसशी भेट घडते आणि त्याला मोक्षाचे दार खुले होते. गुरुगृही शिक्षण व्हावं त्याप्रमाणे मॉर्फियस त्याला तयार करायला घेतो. गुरुला शिष्याचे भूत, भविष्य, वर्तमान सारेकाही माहीत असते त्यामुळे निओकडुन जगाचा सर्वनाश टाळ्ला जाणार आहे याची माहिती मॉर्फियसला अगोदरच असते. प्रकृती आणि पुरुष या सांख्य तत्वज्ञानातील निराकार पुरुष म्हणजे निओ आणि साकार प्रकृती किंवा माया म्हणजे मेट्रीक्स याची जाणीव मॉर्फियस निओला करुन देतो. तो क्षण समाधीचा, ज्ञानाचा, स्वतःला ओळखण्याचा, मोक्षाचा, मुक्तीचा असा असतो. मी कोण या आदिम प्रश्नाचा उलगडा निओला होतो आणि तो आपल्या सामर्थ्याद्वारे जगाचा नाश टाळतो.

हा दृष्टीकोण पाहिल्यावर जेव्हा पारंपरिक भारतीय अध्यात्माशी आपण याचा सांधा जोडु लागतो तेव्हा अनेक अडचणी उद्भवतात. जर आपल्याला भारतीय अध्यात्माचा याचित्रपटाशी संबंध दर्शवायचा असेल तर चित्रपटातील दोन प्रमुख पात्रं वगळावी लागतील याची जाणीव फार थोड्यांना असेल. आपल्याकडे मोक्ष मिळवणार्‍यांचे सारे विकार, वासना शमलेल्या असतात. त्यानंतर त्यावाटेवर साधना सुरु होते. त्यामुळे सर्वप्रथम ट्रीनिटीला वगळावे लागेल. आपल्या अध्यात्मात स्त्रीप्रवेश अशक्य. त्यातही मुक्त झालेल्या पुरुषाला स्त्रीची मदत घ्यावी लागणे म्हणजे फारच झाले. आणि त्यानंतर मोक्ष मिळालेल्या पुरुषाने स्त्रीसंग किंवा प्रणय करणे ही सर्वथैव अशक्य गोष्ट. त्यामुळे मोक्षाच्या वाटेवर असलेल्या निओला भारतीय अध्यात्माप्रमाणे स्त्रीसंग वर्ज असल्याने ट्रीनिटीचे अस्तीत्व येथे शक्य नाही.

दुसरे वगळावे लागेल असे पात्र म्हणजे खुद्द मॉर्फियस. हे वाचुन काहींना धक्का बसेल पण नाईलाज आहे. शिष्यापेक्षा दुर्बळ गुरुची कल्पना भारतीय अध्यात्मात नाही. आपल्या अध्यात्माची कुठलीही शाखा अशी मांडणी मंजुर करणार नाही. आपल्याकडे गुरु हा नेहेमी वरचढच असतो. कदाचित वर्ण व्यवस्थेमुळे तो स्वतः युद्ध करत नसेल पण शिष्याला सारी विद्या शिकवतो. शिष्य विद्येचा गर्व वाहु लागल्यास त्याचा मद झटक्यात उतरविण्याचे सामर्थ्य आपल्याकडल्या गुरुंत असते. चित्रपटात मॉर्फियस दुबळा दाखवला आहे. मग तो निओला ज्ञान कसे काय देणार? एका आंधळ्याने दुसर्‍या आंधळ्याला वाट दाखवण्याचाच हा प्रकार. त्यामुळे आहे त्या स्वरुपात मॉर्फियस आपल्या परंपरेत मंजुर होणार नाही. विरोधाची स्थळे आणखि अनेक आहेत पण तुर्तास इतकेच पुरे.

साम्य स्थळ शोधायचं म्हटलं तर मुळात जे तंत्र मेट्रीक्स चित्रपटात दाखवलं आहे ज्यात मनाच्या सामर्थ्याने सार्‍या गोष्टी घडताना दाखलेल्या आहेत, ते माझ्या समजुतीप्रमाणे योगवशिष्ठाच्या जवळ जाणारे आहे. ही सर्व माणसं मनाच्या सामर्थ्याने पृथ्वीवर जातात. तेथे अचाट कामे करतात. आकाशात उडतात, एका इमारतीवरुन दुसर्‍या इमारतीवर उडी मारतात. फार काय हवं ते शस्त्र काही सेकंदात मिळवतात. त्याचवेळी त्यांचे देह मात्र दुरवर कुठेतरी यानात विशिष्ट यंत्राला जोडुन पहुडलेले असतात. शरीर आणि मनाचा संबंध अतीव निकटतेचा आहे. पृथ्वीवरील त्यांची प्रतिमा ठार मारली गेली तर ते प्रत्यक्षातदेखिल मारले जातात कारण मनाशिवाय शरीराचं अस्तित्व नाही. याउलट यानातल्या यंत्राशी संबंध तोडल्यासही ते मॄत्यु पावतात कारण शरिराशिवाय मनाचेही अस्तित्व नाही. गुहेत ध्यानाला बसलेला योग्याने मनाच्या सामर्थ्याने वस्तु निर्माण करावी तशातलाच हा प्रकार आहे. याबाबत योगवशिष्ठ काय म्हणते ते पाहु. त्यासाठी योगवशिष्ठातली इंदु ब्राह्मणाची गोष्ट सांगायला हवी.

मुनी वशिष्ठ रामाला उपदेश करताना म्हणतात.” मन हेच जगत आहे. हे जे काही समोर दिसत आहे त्याला खरोखर काहीच अस्तित्व नाही. मनानेच या वस्तु निर्माण केल्या आहेत. तुला आता मी जी गोष्ट सांगेन त्यामुळे तुला मनाच्या अचाट सामर्थ्याचा अंदाज येईल. तुला लक्षात येईल कि मनाने एखादी गोष्ट ठामपणे ठरवली कि ती प्रत्यक्षात येते. प्राचिन काळी ब्रह्मदेवाला सकाळी झोपेतुन उठल्यावर पुन्हा नवीन सृष्टी निर्माण करण्याची इच्छा झाली. परंतु त्याने अगोदरच निर्मिती झालेली पाहिली आणि नवलाने त्यानिर्माण झालेल्या जगतातील एका सुर्याला यानिर्मितीचे मूळ विचारले. तेव्हा तो सूर्य म्हणाला….जंबुद्विपात राहणार्‍या इंदु नावाच्या ब्राह्मणाने आणि त्याच्या पत्नीने पुत्रप्राप्तिसाठी शिवाची उपासना केली. त्यांच्या कठोर तपस्येने संतुष्ट होऊन शिवाने त्यंना दहा श्रेष्ठ पुत्र होतील असा वर दिला. हे पुत्र पुढे महाज्ञानी झाले. आईवडील निवर्तल्यावर आपल्या आयुष्याचे ध्येय्य काय याचा विचार त्यांच्या मनात येऊ लागला. संपूर्ण जगाचा राजा जरी झालो तरी ते प्रत्यक्ष भगवंतापेक्षा श्रेष्ठ नसणारच तेव्हा ज्याने विश्व निर्माण केले तो प्रत्यक्ष ब्रम्हदेवच बनणे इष्ट म्हणजे म्हणजे सर्व प्रकारच्या अमर्याद निर्मितीचा आनंद घेता येइल. हे ध्येय्य निश्चीत करुन हे दहा पुत्र पद्मासनात ध्यानाला बसले.आम्ही स्वतःच ब्रह्मदेव आहोत आणि हे विश्व ही आमचीच निर्मिती आहे असा विचार त्यांच्या मनात अखंड, अविरत होता.अशा तर्‍हेने अनेक कल्पे गेली आणि हे दहा जगत प्रत्यक्ष त्यांच्या मनातुन निर्माण झाले.या दहा जगतांचे दहा सूर्य आहेत आणि मी त्यातला एक सूर्य आहे.” जाणकारांना, ज्यांनी मेट्रीक्स बारकाईने पाहिला आहे त्यांना ही कथा वाचुन चित्रपटाशी तिचे साम्य काय हे मुद्दाम फोड करुन सांगण्याची आवश्यकता नाही. मनाद्वारे जगताची निर्मिती ही भारतीय अध्यात्मातील योग दर्शनात वारंवार येणारी संकल्पना आहे. मेट्रीक्स पाहताना मला जाणवलेले हे सर्वात महत्वाचे साम्य आहे.

अतुल ठाकुर