Archive for the Category » Mahabharata «

हा जय नावाचा इतिहास आहे!

हा जय नावाचा इतिहास आहे!

गावी शाळेत असताना माळ्यावर कथारुप महाभारताचं पुस्तक मिळालं होतं. ते कितीवेळा वाचलं असेल त्याची गणतीच नाही. मात्र तेव्हापासुन महाभारताची जी मोहीनी मनावर पडली ती आजतागायत उतरली नाही. किंबहुना ती उत्तरोत्तर वाढतच गेली. महाभारतावरचे चिकीत्सक लेख फार नंतर वाचनात आले. सुरुवातीला “राधेय”, “मृत्युंजय” ने भरावुन गेलो होतो. पुढे इरावती कर्वे याचं “युगान्त” वाचनात आलं. या पुस्तकाने महाभारताकडे पाहण्याची दिशाच बदलुन टाकली. नंतर नरहर कुरुंदकरांचे लेख वाचले. त्यांचे लेख हे माझं प्रेरणास्थान आहे. या लेखांमुळे आणखि खोलात जाण्याची इच्छा झाली. हळुहळु या महाग्रंथाचा दडपुन टाकणारा विस्तार लक्षात येऊ लागला. महाभारताच्या चिकित्सक आवृत्तीची माहीती मिळाली. डॉ.सुखटणकर आणि त्यांच्या विद्वान सहकार्यांचे परिश्रम ध्यानात आले. या ग्रंथाचा अनेकांनी अनेक दृष्टीकोनातुन अभ्यास केला. निव्वळ भगवद्गीता जरी घेतली तरी संत ज्ञानेश्वर, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे या सार्यांच्या विवेचनात फरक आहे. ज्ञानदेव महाराजांनी भक्ती हे गीतेचं प्रधान प्रतिपादन मानलं तर टिळकांनी कर्मयोग हा गीतेचा प्राण मानला. योगी अरविंद तर गीतेच्या प्रभावाने संन्यासीच झाले. ही सर्व थोर मंडळी वगळली तरी सर्वसामान्य भारतीयांच्या मनात पुन्हा या ग्रंथाचं स्थान वरचंच आहे. सर्वसामान्यांना तपशील किती माहीत असतील, चिकीत्सा कितपत कळेल, पटेल, रुचेल हा वादाचा मुद्द असला तरीही महाभारत हा भारतीयांच्या सांस्कृतीक जीवनात खोलवर झिरपलेला ग्रंथ आहे यात शंका नाही.

या सांस्कृतिक ठेव्याचा कुणी कसा आस्वाद घ्यावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मला चिकीत्सा आवडत असली तरीही माझ्यापेक्षा वेगळ्या दिशेने विचार करणार्याबद्द्ल निव्वळ विस्मयच नव्हे तर आदर देखिल मला वाटायला हवा. याचं कारण हा महाग्रंथ अगणित शक्यतांनी भरलेला आहे. कर्णाबद्दल प्रचंड सहानभुती असलेला एक वाचकवर्ग आहे. लगेचच कर्णाचे दौपदी वस्त्रहरणाच्या वेळचे वागणे न पटलेला दुसरा वर्ग आहे. काहींना श्रीकृष्ण नसता तर कर्णासमोर युद्धात अर्जुनाचं काही खरं नव्हतं असं सतत वाटत राहतं. तर काहीजण पटकन विराटाकडे राहताना अर्जुनाने एकट्याने भीष्म, द्रोण व कर्णाच्या केलेल्या पराभवाची आठवण करुन देतात. एक परंपरा द्रौपदीचं मन कर्णावर देखिल जडलं होतं हे सांगणारी आहे. तर खुद्द महाभारतात “सूतपुत्राला वरणार नाही” म्हणून त्या महवीराला नाकारणारी द्रौपदी आहे. एकीकडे सर्वसाधारणपणे सच्छील म्हणुन माहित असलेला धर्मराज हा धीमा, खोल, व्यवहारी आणि पुरेसा कठोर होता हे डॉ.नांदापुरकरांनी सिद्ध केलं आहे. दुसरीकडे दाजी पणशीकरांनी महाभारताची संगतीच सूड या मध्यवर्ती कल्पनेत लावण्याचा प्रयत्न केला आहे. इरावती कर्वेंच्या युगान्त मध्ये भीष्म हा वृद्ध आणि आदरणिय असल्याने दोन्ही बाजूंना अडचणीचा झाला होता असं म्हटलं आहे तर कुरुंदकरांनी महान भीष्म वर्माच्या ठिकाणी आल्यावर कसे चुकीचे निर्णय घेऊ लागतो आणि म्ह्णुनच महान पराक्रमी भीष्म हा महान अपयशी देखिल आहे हे सप्रमाण दाखवुन दिलं आहे. ही लिहीता लिहीता मला आठवलेली काही उदाहरणं. खरंतर महाभारतातील प्रत्येक लहानमोठी व्यक्तीरेखा एखाद्या कॅलिडोस्कोपप्रमाणे आहे. पाहण्याचा दृष्टिकोण किंचित बदलला तरी ते व्यक्तीमत्व वेगळंच दिसु लागतं. असंख्य पैलु असलेल्या अमुल्य रत्नासारखा हा महाग्रंथ आपल्या प्रत्येक पैलुत अनेक रहस्य दडवुन राहिल्यासारखा मला वाटतो.

महाभारतातील व्यक्तींच्या मर्यादांबद्द्ल बरेच बोलले गेले आहे. तरीही त्याबाबत काही लिहीणं अस्थानी ठरणार नाही. कारण महाभारतातील व्यक्तींना मर्यादा आहेतच मात्र या सार्या व्यक्ती विशिष्ट परीस्थितीत सापडलेल्या आहेत. पूर्णपणे मानवी आहेत. तदअनुषंगाने त्यांच्या मर्यादा दिसुन येतातच मात्र काहीवेळा कुठल्याही परीस्थितीत हार न मानण्याची चिवट वृत्तीही दिसुन येते. ब्राह्मण असुन देखिल क्षत्रियांचा धर्म पाळणारे पितापुत्र द्रोण-अश्वत्थामा. स्वधर्म पालनाच्या त्या युगात त्यांची प्रचंड घुसमट झाली असेल. जन्मरहस्य माहित नसलेला तरीही स्वतःच्या श्रेष्ठत्वाचा अंदाज असलेला आणि म्हणुनच जास्तच गोंधळलेला सुतपुत्र कर्ण. पांडवांकडे सहानुभुती ठेवुन दुर्योधनाकडुन लढणारे पितामह भीष्म. प्रत्यक्षात अंध असतानादेखिल पुत्रमोहाने परिपूर्ण आंधळा झालेला धृतराष्ट्र. जगातील सार्या नीतितत्वाचं ज्ञान असलेला परंतु युद्ध टाळु न शकलेला दासीपुत्र विदुर. जुगारापायी बायको, भाऊ सार्यांना पणाला लावणारा धर्मराज युधिष्ठीर. अर्जुनाने जिंकलेली, पाचांची पत्नी झालेली, तरीही अखेरच्या समयी अर्जुनावरच जास्त प्रेम केल्याचा आरोप झालेली द्रौपदी. याउलट भीष्माला मारण्यासाठी दुसरा जन्म घेणारी अंबादेखिल याच महाभारतात आहे. दु:शासनाच्या रक्ताने वेणी घालण्याची प्रतिज्ञा करणारी मानीनी द्रौपदी आहेच. दीर्घद्वेष इतका की भीम समजुन लोखंडाचा पुतळा मोडणारा धृतराष्ट्रसुद्धा येथेच आहे. एके ठिकाणी गुरुची झोपमोड होऊ नये म्हणून भुंग्याकडून स्वतःची मांडी पोखरु देणारा आणि त्याचं बक्षीस म्हणून ऐनवेळी विद्या विसरण्याचा शाप सहन करणारा कर्ण आहे. तर त्याच गुरुला आपल्या प्रतिज्ञेत बाधा आणण्याचा प्रयत्न केल्याने युद्धात पराभुत करणारा भीष्म देखिल आहे. कौरवांकडे असलेली सर्व माणसं वाईट नाहीत. धर्मयुद्धाचे नियम पांडवांनीसुद्धा मोडलेले आहेत. निव्वळ क्रौर्यातदेखिल कुठलाही पक्ष कमी पडताना दिसत नाही.

दु:शासनाची छाती फोडणारा भीम क्रूर म्हणावा तर कौरव महावीरांनी ज्या तर्हेने अभिमन्युला ठार केले ती पद्धत फारशी वीरोचित नव्हती. घटोत्कचाचा बळी अर्जुनासाठी देण्यात आला. कर्णाला आपली वासवी शक्ती घटोत्कचासाठी वापरावी लागली. द्रोणाचार्य शस्त्र खाली टाकुन बसले असता त्यांना ठार मारण्यात आलं. पुढे अश्वत्थाम्याने सार्या सीमा पार केल्या आणि रात्रीचं हत्याकांड घडवून आणलं. महाभारतात मानवी विकार उफाळुन आलेले अनेक प्रसंगी जाणवतात. शिवाय ते इतक्या आणि अशा काही आवेगाने उसळतात की वाचताना क्षणभर दिग्मुढ व्हायला होतं. वरणावतात स्वत:ला वाचवताना पांडवांनी निरपराध निषादीला तिच्या पाच पूत्रांसह जाळुन टाकलं. धर्मराज युधिष्ठीराने किंवा वेदनेचं वरदान परमेश्वराकडे मागणार्या कुंतीने याला आक्षेप घेतलेला आढळत नाही. खांडववन जाळतानादेखिल वनातले सारे प्राणी जळुन भस्मसात झाले. कृष्णार्जुनाने कुणालाही बाहेर येऊ दिलं नाही. जिंकुनदेखिल अर्धे राज्य परत केलेल्या द्रोणाच्या मृत्युची तजवीज द्रुपदाने धृष्ट्द्युम्नाला यज्ञातुन मागुन केली. महासती गांधारी पुत्रांचे सारे दोष दुर्लक्षीत करुन कुलसंहाराला कारणीभूत ठरलेल्या कृष्णाला शाप देऊन मोकळी झाली. मयसभेत पाय घसरुन पाण्यात पडलेल्या दुर्योधनाला “आंधळ्याचा पुत्र आंधळा” म्हणण्याइतका विषारीपणा द्रौपदीत होता. शौर्य आणि तत्त्वज्ञान या दोन्हींत अजोड असलेल्या भीष्माला इतरांसाठी स्वयंवरातुन मुली पळवता येत नाहीत हे माहित नसेल असे वाटत नाही. गुरु द्रोणांचा स्वतःच्या मुलाला जास्त विद्या देण्याचा बेत अर्जुनाने हाणुन पाडला. आणि याच प्रिय शिष्यासाठी एकलव्याला आपला अंगठा गमवावा लागला. मानवी विकारांचं अतिशय प्रत्ययकारी चित्रण महाभारतात जागोजाग आढळुन येतं.

महाभारत हा माझ्या अभ्यासाचा भाग आहे म्हणण्याइतका माझा या विषयाचा व्यासंग नाही. मात्र आयुष्यात एकाच पुस्तकाची जर कधी निवड करावी लागली तर हा एकच ग्रंथ माझ्यासमोर असेल. “व्यासोच्छीष्टं जगत्सर्वं” म्हटलं गेलं आहे. सारं काही व्यासांनी आधीच सांगुन ठेवलं आहे. महाभारतात खरोखरच काय नाही? कथा, काव्य, नाट्य, युद्ध, शौर्य, शांत रस, अद्भुत, शृंगार, नीती, तत्त्वज्ञान, मानसशास्त्र, धर्मकारण, राजकारण, समाजकारण, सारंकाही महाभारतात आहे. अनासक्ती, स्थितप्रज्ञ वृत्ती सारखं मला कायम आकर्षित करणारं व्यवहारीक तत्त्वज्ञान आहे. महाभारतात बुडी मारल्यावर दुसर्या कशाचीच गरज भासत नाही. गीतेचं तत्त्वज्ञान हे उच्चवर्णियांचं आहे वगैरे म्हणण्याइतका डावेपणा माझ्यात नाही. मला स्वतःला जे हवं आहे ते येथुन मिळतं. जे नको आहे ते मला टाळता येतं. जे पटत नाही ते ईश्वरी आहे म्हणुन मानण्याचा कडवेपणाही मजजवळ नाही. हजारो वर्षापूर्वी एक अशी संस्कृती येथे नांदली ज्यांनी फलाची अपेक्षा न करता कर्म करणं हा आपला धर्म मानला. ज्यांनी स्वाभीमानाशी कसलीही तडजोड केली नाही. न्याय्य गोष्टीसाठी भाऊबंध, नातेवाईक यांच्या विरुद्ध युद्ध करणे पसंत केले मात्र अन्याय सहन केला नाही. पाच शूरवीर पांडवांची द्रौपदीसकट सेवेसाठी प्राप्ती होताना दुर्योधनाला न सोडणारा कर्ण येथे आहे. युद्ध जिंकल्यावर उपभोग न घेता धृतराष्ट्र, गांधारीबरोबर वनात जाणारी कुंती आहे. द्रौपदीच्या सार्या इच्छा पूर्ण करण्यासाठी धडपडणारा भीम आहे. स्वतःच्या मृत्युचा उपाय सांगुन पांडवांचा मार्ग मोकळा करणारा भीष्म आहे. शस्त्र न उचलता अर्जुनाचं सारथ्य करण्याची जबाबदारी उचलणारा श्रीकृष्ण आहे. हे सारे माझ्यासाठी अखंड प्रेरणेचे झरे आहेत. आणि त्यासाठी मला माझ्या संस्कृतीबद्दल अतिशय कृतज्ञता वाटते.

अतुल ठाकूर