Archive for the Category » Mahatma Gandhi «

महात्मा गांधी, सत्याचे प्रयोग अथवा आत्मकथा

mahatma_gandhi

महात्मा गांधी हे बहुधा भारतीय राजकारणातील सर्वात वादग्रस्त व्यक्तीमत्व असावं. प्रत्येक भारतीयाला त्यांच्याबद्दल बोलावसं वाटतं, प्रेमाने अथवा द्वेषाने, मात्र ते त्यांना दूर्लक्षित करु शकत नाहीत. बरेचदा तथाकथित पेटलेल्या तरुणांमध्ये गांधींवर टीका करण्याची फॅशन दिसुन येते. गांधींवर टीका केल्याने आपण आपोआपच जहालवादी, क्रांतिकारक, शूर वगैरे होतो असाही (गैर?) समज आढळ्तो. काहीवेळा ही मतं एकांगी, संकुचित स्वरुपाची नाटकं पाहून किंवा तत्सम साहित्य वाचुन बनलेली असतात. मला हे मानावं लागेल की मी स्वतः बराच काळ याच पंथाचा होतो.

शालेय अभ्यासक्रमात शिकवल्या जाणार्या इतिहासातुन गांधी कळण्याची शक्यता फारच कमी. गांधींबद्दल बोलण्याआधी शालेय इतिहासापेक्षा खुद्द त्यांच्या साहित्याशीच ओळ्ख असणं जास्त योग्य. इतरांचं माहीत नाही, पण निदान माझ्यासाठी तरी गांधींचं वाङमय कधीही सोपं नव्हतं. वाचताना आपण कुठेतरी कमी पडतो आहोत, इथे पाणी बरंच खोल आहे, काहीतरी समजण्याचं राहुन गेलं आहे असंच वाटत राहीलं. त्यांच्या वाङमयाचं परिशीलन आणि त्यानुसार त्यांनी घालवलेलं जीवन यांचा अभ्यास एवढा एकच मार्ग गांधी समजण्यासाठी मला उपलब्ध होता. काही वर्षांपुर्वी मित्राच्या सांगण्यावरुन गांधींचं “सत्याचे प्रयोग अथवा आत्मकथा” वाचायला घेतलं. या पुस्तकाचा माझ्यावर कायमस्वरुपी टिकणारा परीणाम झाला. आजही हे पुस्तक मला पुर्णपणे कळलेलं नाही, मात्र त्याचं अधुनमधुन वाचन सुरु असतं. अनेकदा त्यातुन नवीन कहीतरी सापडतं.

गांधींच्या साध्या, सोप्या भाषेने मन केव्हाच काबीज केलं होतं मात्र त्या साध्या भाषेत वज्र लपलेलं आहे याचा अंदाज प्रथम आला नाही. अतिशय शांतपणे, पहील्या पानावरच ते आपल्या वडीलांबद्दल पुढील विधान करतात. ” वडील कुटूंबप्रेमी, सत्यप्रिय, धीट, उदार पण रागीट असे होते. काहीअंशी विषयासक्तही असावेत. त्यांचा शेवटचा विवाह चाळिसाव्या वर्षानंतर झाला होता.” या वाक्यांनी मी थरारलो होतो. आयुष्यभर, पावलोपावली, सतत कठोर आत्मपरीक्षण करणार्या गांधींनी प्रत्यक्ष स्वतःच्या वडीलांबद्दल लिहीतानादेखिल तीच दृष्टी कायम ठेवली. संयम बाळगतानाच लेखणीची धार कमी होऊ दिली नाही.

लहानपणी सतत वडीलांच्या सेवेत मग्न असलेल्या, वडीलांच्या अनेक गुणांवर लुब्ध असलेल्या गांधींना त्यांच्याबद्दल इतकं सडेतोड लिहीणं सोपं गेलं असेल? या अनासक्त स्थितीला येण्यासाठी किती कष्ट, दु:ख, हालअपेष्टा सोसाव्या लागल्या असतील हे त्या महात्म्यालाच ठाऊक. गीतेत सांगीतलेली स्थितप्रज्ञ अवस्था कदाचित हीच असेल. गांधींचा हा समतोल, संयम शब्दाशब्दांमध्ये दिसुन येतो. स्वतःचे राजकीय गुरु मानलेल्या गोपाळ कृष्ण गोखल्यांवरचं गांधींचं लिखाण म्हणजे या समतोलाचा उत्कृष्ट आदर्श आहे.

स्वतःचं आयुष्य वाळत घातलेल्या कपड्याप्रमाणे उघडं टांगुन दाखवणारी आत्मचरीत्रं कमी नसावीत. भाषेचा चटपटीतपणा, विशिष्ट प्रसंग खुलवुन सांगण्याची किमया, अनाठायी आत्मसमर्थन वगैरे नेहेमीचे यशस्वी प्रकार या पुस्तकात कुठेही नाहीत. इथे आहे फक्त थेट हृदयाला भिडणारी भाषा. एखाद्या शास्त्रज्ञाने आपल्या प्रयोगांबद्दल लिहावं तसंच परंतु जराही खडबडीत रुक्षपणा न आणता केलेलं हे लिखाण आहे. स्वजनांच्याबाबत देखील सत्याशी तडजोड न करणार्या या महात्म्याची सत्य, अहिंसेसाठीची कळ्कळ पानोपानी दिसुन येते. कारण सत्य, अहिंसा हे गांधींसाठी केवळ शब्द नव्हते तर ती त्यांच्या आयुष्याची साधना होती. गांधींनी आपलं सारं आयुष्य त्यासाठी वेचलं. आणि शेवटी आयुष्याचं बलिदानदेखिल त्यासाठीच केलं.

अतुल ठाकुर