Archive for the Category » Psychology «

हरवलेला मी शोधण्याचा प्रयत्न…मुक्तांगण फॉलोअप आयपीएच ठाणे दि ११/८/२०१३

muktangan

मुक्तांगणच्या फॉलोअपला शेवटपर्यंत थांबायचे ठरल्यावर यावेळी अगदी रिलॅक्स होतो. त्यामुळे बर्‍याच गोष्टी नव्याने लक्षात आल्या. कार्यकर्त्यांचे काम किती कष्टाचे आहे हे तर… पाहिलेच मात्र त्याचा पराकोटीचा संयम देखिल पाहायला मिळाला. कुणाची पत्नी पतीला घेऊन येते. काकुळतीने दाखल करुन घेण्याची विनंती करते आणि व्यसनाच्या संपूर्ण आहारी गेलेल्या पतीला कसलीच शुद्ध नसते. जणु काही पत्नीचा आक्रोश त्याच्या पर्यंत पोहोचतच नसतो. काहीजण टकटकीत नजरेने समोर पाहात असतात. समोर जे काही चाललेले आहे त्याच्याशी त्यांचा काही संबंधच नसतो. माधवसरांनी एकदा व्यसनाच्या टोकाशी गेलेली माणसे कल्पनेच्या जगात वावरु लागतात सांगितले होते त्याची आठवण अशा वेळी होते. यावेळी तर एक ऐशी वर्षाचे आजोबा आले होते. त्यांच्या मुली त्यांना घेऊन आल्या होत्या. आजोबांचे पीणे गेल्या काही वर्षात वाढले होते. आजोबांना मात्र आपल्या काही झाले आहे याची कल्पनादेखिल नव्हती. अशा परिस्थीतीत मुक्तांगणचे कसलेले योद्धे एकेका रुग्णाला त्याच्या कुटुंबियांसहीत समुपदेशन करतात आणि त्यानंतर माधवसरांकडे घेऊन येतात. त्यानंतर ज्याप्रमाणे फिनिशींग टच द्यावा तसे माधवसर पुढील समुपदेशन करतात. सरतेशेवटी कुटुंबियांच्या चेहर्‍यावर समाधानच दिसते. पुढची लढाई त्यांच्या माणसाने लढायची असते. त्यात तो एकटा नसतो. मुक्तांगण सर्वार्थाने त्याच्या बरोबर शेवटपर्यंत राहाणार असते.

मुक्तांगणमधुन उपचार घेऊन लवकरच बाहेर येणार असलेले व्यसनमुक्त रुग्ण हे त्यांच्या बर्‍या होण्याने अतिशय उत्तेजित झालेले असतात. माधवसरांनी अशावेळी घरच्याना सावध राहण्याचा इशारा दिलेला असतो. यावेळी एक अशा वहिनी माधवसरांसमोर मन मोकळं करताना पाहिल्या. आपलं माणुस येणार याचा आनंद तर अर्थातच होता. मात्र जुन्या कडवट आठवणीही अजुन जाग्या होत्या. त्यामुळे आता पुढे काय याचा ताण देखिल होता. माधवसरांनी त्यांना काही उपाय सुचवले. थोडसं त्या माणसांच्या कलाने घेणे, त्यांच्या आवडीचे पदार्थ करणे, त्यांना एकटे न सोडणे, त्यांच्यावर विश्वास दाखवणे मात्र त्याच वेळी बारीक नजर ठेवणे, जुन्या गोष्टी उगाळण्याचे कटाक्षाने टाळणे असे त्यातील काही उपाय होते. यावेळी आणखि एक महत्त्वाचा व्यसनाचा प्रकार पाहायला मिळाला. दारुपासुन मुक्ती मिळाली मात्र त्याची जागा दुसर्‍या कशाने तरी भरुन काढण्याचा प्रयत्न सुरु झाला. असाही एक रुग्ण तेथे आला होता. पत्नीच्या डोळ्यात अश्रु होते. माधवसरांनी यावेळी मात्र मैत्रीचा आणि वडीलकीचा धाक त्या रुग्णाला दाखवुन काही उपाय सुचवले. रुग्णमित्राने देखिल शांतपणे ऐकुन घेऊन त्यानुसार वागण्याची ग्वाही दिली. शेअरींग करण्याचं महत्त्व सर नेहेमीच सांगतात. मात्र त्याचं प्रात्यक्षिक अशावेळी दिसतं.

काही कुटुंबिय आपलं माणुस मुक्तांगणमध्ये कसं काय राहत आहे याची चौकशी करण्यासाठीही आले होते. अशा वेळी ती ती माणसं, त्यांची व्यसनमुक्तीतील प्रगती, काहीवेळा त्यांच्या स्वभावामुळे येणारे अडथळे, त्याला करावे लागणारे उपाय या सार्‍या गोष्टींची चर्चा माधवसर त्यांच्या बरोबर करत होते. हा एक अवघड मामला होता. इगो आणि डिनायल हे सर्वात मोठे अडथळे व्यसनमुक्तीच्या मार्गात असतात. हे अडथळे निपटुन काढण्याचा प्रयत्न मुक्तांगणमध्ये होतो. मात्र काही प्रयत्न हे रुग्णाकडुनदेखिल व्हावे लागतात हे फॉलोअप मध्ये नेहेमी सांगितलं जातं. तेच माधवसर अशा रुग्णांच्याही बाबत त्यांच्या नातेवाईकांना समजावुन सांगत होते. मात्र मार्ग तेथेच संपला नव्हता. नवनवीन उपाय माधवसर सुचवत होतेच. या फॉलोअपमध्येदेखिल नेहेमीप्रमाणेच व्यसनमुक्त झालेले रुग्णमित्र बोलले. त्यांनी आपले अनुभव सांगितले. समोर बसलेल्यांना एक नवी आशा दाखवली. उभारी दिली, उत्साह दिला. मात्र माधवसरांचं एक वाक्य मनात राहीलं. मुक्तांगण मध्ये पाच आठवडे मिळतात, माझा हरवलेला मी शोधण्यासाठी. येथे आत्मविश्वासाने बोलणारी व्यसनमुक्त मित्रमंडळी पाहीली की त्यांना आपला मी गवसला आहे याची सार्थ प्रचिती येते.

अतुल ठाकुर