Archive for the Category » Support Groups «

एक झुंज वादळाशी – सुलभाताई

sulabhatai

संशोधनाच्या दरम्यान निरनिराळे सपोर्ट ग्रुप्स पाहावेत असे वाटत होते. जरी जास्त सपोर्टग्रुप्स संशोधनाच्या कक्षेत आणता येणार नव्हते तरी प्रत्येक सपोर्टग्रुपचे काम पाहुन अनेक वेगवेगळ्या गोष्टी कळत होत्या. अगदी सुरुवातीला फक्त मुक्तांगणच्या सपोर्टग्रुपवरच काम चालले होते. त्यानंतर पार्किन्सन्स मित्रमंडळ पुणे हा सपोर्टग्रुप पाहिला. एपिलेप्सी च्या रुग्णांसाठी चालवलेला संवेदना हा ग्रुप पाहिला. त्यावेळी हे लक्षात आले कि हे सर्व जरी सपोर्टग्रुप या एका संज्ञेखाली वावरत असले तरी यांच्या कार्यप्रणाली भिन्न आहेत. आणि ज्या आजारासाठी, वा समस्येसाठी हे सपोर्टग्रुप काढले गेलेत त्या आजाराच्या स्वरुपावर हे भिन्नत्व अवलंबुन आहे. मुक्तांगणचा सपोर्टग्रुप अटेंड करायला आयपीएच ला जात होतोच. तेव्हा असं कळलं कि आयपीएच चे स्वतःचे सपोर्टग्रुप्स आहेत. ते पाहण्याचे ठरवले. त्यावेळी सुलभाताई एलओसी (लोकस ऑफ कंट्रोल) नावाचा सपोर्टग्रुप घेतात हे माहित झाले. त्यांच्याशी संपर्क केला. लगेच परवानगी मिळाली. आणि एका रविवारी दुपारी आयपीएचला पोहोचलो. एक सडसडीत हसतमुख, करड्या पांढर्‍या केसांची महिरप कपाळाभोवती असलेल्या, ठसठशीत कुंकु लावलेल्या बाई समोर आल्या. हे सुलभाताईंचे पहिले दर्शन. त्यांनी मला ग्रुपच्या रुममध्ये नेले. माणसे जमायला सुरुवात झाली होती. सुलभाताइंनी रजिस्टर आणले. आणि ग्रुपला सुरुवात झाली. ….ग्रुपला सुरुवात झाली आणि सुलभाताईंची खरी ताकद लक्षात आली. हे एका वादळाशीच झुंजणं होतं.

मानसशास्त्रातील बर्‍याचशा आजारांबद्दल ऐकलं होतं. काही पुस्तकंही वाचली होती. डिप्रेशन, एंझायटी, स्किझोफ्रेनिया वगैरे शब्द परिचित होते. पण अँटी सोशल पर्सनॅलिटी डिसऑर्डर (एएसपीडी) आणि बॉर्डरलाईन पर्सनॅलिटी डिसऑर्डर (बीपीडी) म्हणुन काही असते याचा पत्ता नव्हता. सुलभाताई या आजाराने ग्रासलेल्या मुलांच्या पालकांसाठी हा ग्रुप चालवतात. यावरुनच आजाराचे गांभीर्य लक्षात आले. ज्यांना आजार आहे त्यांना आपल्याला काही आजार आहे असे वाटतच नसते. मुळात कुणाचेच न ऐकणे हे आजाराचे महत्त्वाचे लक्षण असल्याने त्यांनी ग्रुपला येण्याचा प्रश्नच नसतो. बरेचदा प्रकरण समजवण्याच्या पलिकडे गेलेले असते. आणि आईवडिल मात्र मुलांच्या वागण्याने पार खचुन गेलेले असतात, झुरणीला लागलेले असतात. त्यांना आधाराची गरज असते. कुणाची मुलगी, रात्री बेरात्री न सांगता बाहेर राहते, तर कुणाचा मुलगा मोबाईल घेऊन दिला नाही तर आत्महत्या करण्याची धमकी देतो, कुणाची मुलगी एवढ्यातेवढ्यावरुन मनगटाची शीर कापुन घेते, तर कुणाचा मुलगा पैसे दिले नाहीत तर घर सोडण्याची धमकी देतो. सुरुवातीला लहान मुल हट्टी आहे असे वाटुन दुर्लक्ष केले जाते. पण वय वाढत जाते तसे वागणे अनावर होऊ लागते. तेव्हा याचे गांभीर्य लक्षात येते. आपले मुल इतरांपेक्षा वेगळे आहे याची जाणीव धक्कादायक असते. यावर काय करावे ते सुचत नाही. हा एक प्रकारचा मानसिक आजार आहे आणि यावर उपचार घ्यावे लागतात हे देखिल माहित नसते.

पुढे परिस्थिती जास्त गंभीर बनते कारण मुड स्विंग्ज आटोक्यात ठेवणे इतपतच काही औषधे यावर काम करु शकतात. या मुलांना कह्यात ठेवण्यासाठी काही पद्धती वापराव्या लागतात. आपल्या स्वभावात, वागण्यात बदल करावे लागतात. त्यांना ओरडून, समजावुन, मारहाण करुन फायदा नसतो. त्यांच्याशी आपले वागणे बदलावे लागते. काही निश्चित ठोकताळे ठरवावे लागतात. हट्ट केल्यावर काही गोष्टी द्यायच्या कि नाहीत, द्यायच्या तर कशा द्यायच्या, नाही द्यायच्या तर काय कारणं सांगायची, आपल्या भुमिकेवर ठाम कसं राहायचं, मुलं इमोशनली ब्लॅकमेल करु लागली तर काय करायचं, वेळ पडल्यास पोलिसांची मदत कशी घ्यायची या सार्‍या गोष्टी सुलभाताई या पालकांना शिकवतात. या ग्रुपमध्ये सुलभाताईंचं हे शिकवणं मी पाहिलं आहे. नवीन आलेल्या पालकांची अगतिकता पाहिली आहे. आणि ग्रुपमधल्या जुन्या मेंमबर्सने नव्यांना धीर देताना पाहिले आहे. “अहो मी जेव्हा तुमच्यासारखा आलो होतो तेव्हा अगदी खचुन गेलो होतो पण आता मात्र…..”अशासारख्या वाक्यानंतर त्यांच्या सक्सेस स्टोरीज ऐकल्या आहेत. रात्र रात्र घराबाहेर राहणारी मुलगी आता वडिलांना चविष्ट जेवण बनवुन देते आहे, माझी मुलगी पोळी अतिशय सुरेख बनवते … हे सांगताना वडिलांचा आनंदाने फुललेला चेहरा पाहिला आहे. सुलभाताईंच्या ग्रुपमध्ये सुलभाताई इतरांना बोलायला लावतात. कुणी आपली समस्या मांडली तर सर्वप्रथम त्या इतरांना या समस्येवर तुम्ही काय उपाय सुचवाल हे विचारतात. हे खुप परिणामकारक ठरतं असं माझं निरिक्षण आहे. कारण या सर्व अनुभवांमधुन गेलेली मंडळी आत्मविश्वासाने आपले अनुभव सांगतात. आणि समोरच्यालादेखिल ही मंडळी अनुभवी असल्याने त्यांच्या सल्ल्यामुळे धीर वाटतो.

सुलभाताईंशी बोलायला लागल्यावर आणखिनच विस्मयचकित व्हायला झालं. माणसं कुठल्याही वयात स्वप्नाचा ध्यास घेतात आणि त्यात यशस्वी होतात याचं त्या मुर्तीमंत उदाहरण आहेत. मायक्रोबायलॉजी मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेऊन बड्या कंपनीत मोठ्या पदावर १२ वर्षे काम केलेल्या सुलभाताईंना आपल्यात समुपदेशनाचे गुण आहेत हे तेव्हाच लक्षात येऊ लागले. कंपनीनेच त्यांचे हे गुण हेरुन समुपदेशनाची काही कामे त्यांच्याकडे सोपवली. पुढे सुलभाताईंच्या आई आणि वडिल दोघांच्या आजारपणात त्यांना सेवा, सोबतीसाठी हॉस्पीटमध्ये राहावे लागले. तेव्हा शेजारीपाजारी अनेकांशी बोलावे लागे. त्यावेळी लोकांना भावनिक आधाराची अतिशय गरज असते आणि तो कुणी दिल्यास त्यांना खुप बरं वाटतं हे त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी समुपदेशन हेच आपलं ध्येय ठरवलं. आणि त्या आयपीएच मध्ये दाखल झाल्या. आयपीएचच्या अनेक प्रोजेक्टस मध्ये त्यांनी भाग घ्यायला सुरुवात केली. हे काम आपल्याला जमेल असा त्यांना विश्वास वाटला. त्यानंतर मात्र सुलभाताईंनी मागे वळुन पाहिलंच नाही. आयपीएच मध्ये आणि बाहेर देखिल आपल्या विषयाबद्दल जे काही मिळेल ते शिकण्यास त्यांनी सुरुवात केली. त्यांनी इग्नु मधुन एमएसडब्लु केलं, मुंबई युनिव्हर्सिटीमधुन जे कोर्सेस करता येणे शक्य होते ते सारे केले. त्यात डिसास्टर काउंसिलिंग, एचआयव्ही काउंसिलिंग, ऑटीझम काउंसिलिंग होतं. आयपीएचमध्ये आरइबीटी चा अभ्यासक्रम पूर्ण केला. अजुनही त्या नवनवीन गोष्टी शिकत असतात. हाती घेतलेला वसा पार पाडताना परिपूर्णतेचा ध्यास असलेलं हे दुर्मिळ उदाहरण.

“एएसपीडी आणि बीपीडीचा विचार करताना पालकांसाठी ग्रुप सुरु करावा असे ठरले आणि डिसेंबर २०११ पसुन या ग्रुपची सुरुवात झाली. माझ्या सोबत आयपीएचचे मानसोपचारतज्ञ डॉ. कमलजीत देखिल या ग्रुपसाठी काम करतात.” सुलभाताई सांगत होत्या,”मुलांच्या नाठाळपणामुळे या आजारात पालक आणि मुलांमध्ये अक्षरशः युद्ध सुरु असतं. मारहाणीचे प्रकार तर नेहेमीचेच. मात्र कालांतरांने पालक वृद्ध होतात आणि मुले तरुण होतात. त्यांना मारहाण करता येत नाही. मग पालकांवर हात उगारण्याचे प्रकार घडतात. मुलांना तर सर्व जग फक्त आपल्याभोवतीच फिरतं असं वाटत असतं. आपण सर्व जगाच्या मध्यावर आहोत, स्टार आहोत अशा भ्रमात ती वावरत असतात. अशावेळी कोण चुक आणि कोण बरोबर असा वाद त्यांच्याशी घालण्यात अर्थ नसतो. पालकांनीच समजुतदारपणे स्वतःवर संयम ठेवला तर बरंच काही साध्य करता येतं. ही मुलं वयाच्या १२-१३ वर्षापासुन ही लक्षणे दाखवु लागतात. त्यांच्यात डिमांड करण्याची प्रवृत्ती प्रचंड असते. स्टाईल मध्ये राहायला पाहीजे, चमचमीत खायला पाहिजे. या सार्‍यासाठी पैसा तर पाहिजेच. तो दिला नाही तर घरातुन निघुन जाईन ही धमकी. खुन करेन ही धमकी. मोबाईल दिला, तर तो मोठाच हवा. आणि पाहीजे म्हणजे पाहिजेच हा खाक्या. पुढे घरात चोर्‍या करणे, मोबाईल विकुन पैसा आणणे, मित्रांबरोबर चैन, खाणे, पिणे, सिगारेट ओढणे, हे प्रकार सुरु होतात. एएसपीडीने ग्रासलेली मंडळी इतरांना इजा करु शकतात. त्यातुनच आईवडिलांना मारहाण करण्याचे प्रकार घडतात. हे एक टोक तर बीपीडीवाले स्वत:लाच इजा करुन घेतात, त्यांच्यात आत्महत्येची प्रवृत्ती असते, हे दुसरं टोक. या दोन्ही प्रकारात व्यसनाकडे वळण्याची शक्यता खुप असते. मुडस्विंग्जही खुप असतात. यांना सतत काहीतरी एक्साईट करणारं हवं असतं. “

“नंतर ही मुलं बाहेर चोर्‍या करु लागतात. आईवडिल एकमेकांना यासाठी दोषी ठरवत असतात. मनातुन खचलेली ती माणसे असं का झालं आणि त्याहिपेक्षा असं आपल्याच नशीबी का आलं या सततच्या कुरतडणार्‍या विचाराने खंगत,पिचत जातात. समाजात हा असा काही आजार असतो याची कल्पना नसते. त्यामुळे वाया गेलेलं मुल असा डाग माथी येतो. त्यामुळे समाजात वावरताना शरम वाटते. पुढे प्रकार हाताबाहेर गेल्यावर मुलांना घराबाहेर काढणे हा एकच मार्ग उरतो.” सुलभाताईंचे बोलणे ऐकताना पालकांना कुठल्या दिव्यातुन जावे लागत असेल याची कल्पना येत होती. पुढे त्या म्हणाल्या,” यावरील औषधांचा उपयोग मर्यादीत असतो. त्यामुळे या मुलांचे मूडस्विंग्ज आटोक्यात येऊ शकतात. पण बाकी गोष्टींसाठी बिहेवियर थेरेपीच महत्त्वाची ठरते.” सुलभाताई ग्रुप घेताना एक एक समस्या घेऊन त्यावर काम करतात. काही पर्याय हे पालकांना पटत नाहीत तेव्हा त्या दुसरे पर्याय सुचवतात. एकाच पर्यायाचा आग्रह धरत नाहीत. ही संवेदना मला फार महत्त्वाची वाटली. पालक मुळात स्वतःच्या समस्येवर उपाय शोधुन स्वतःचा ताण कमी करण्यासाठी येथे आलेले असतात. त्यांच्यावर कसलिही जबरदस्ती करण्यात अर्थ नसतो. ग्रुपमध्ये नवीन आलेले पालक हे अगदी द्विधा मनस्थितीत असतात. मुलांवर त्यांचे खरोखर प्रेम असते. पण ते करीत असलेला छळवाद देखिल सहन करण्यापलिकडे गेलेला असतो. त्यामुळे या मुलांना योग्य मार्गावर आणण्यासाठी भावनांना बाजुला सारुन काहीवेळा कठोर निर्णय घ्यावे लागतात. मुलांच्या अवाजवी मागण्यांना स्पष्टपणे नाही म्हणणे, त्यांच्या धमक्यांना न घाबरणे, त्यांच्यासमोर मान न तुकवणे, प्रसंगी त्यांच्या हिंसकपणाला आळा घालण्यासाठी पोलिसांची मदत घेणे अशासारखे काही उपाय हे त्या मुलांच्या चांगल्यासाठीच असतात. पण त्यासाठी पालकांच्या गळी हे उपाय उतरवणे ही तारेवरची कसरत देखिल सुलभाताईंनाच करावी लागते.

सुन्न करणार्‍या या आजाराबद्दल ऐकल्यावर सुलभाताईंना समुपदेशन करताना याचा त्रास होत असेल असे वाटले. पण त्या खुप स्ट्राँग आहेत. शिवाय अतिशय आशावादी देखिल. कदाचित वाईटात चांगले पाहण्याच्या या वृत्तीमुळे त्यांना त्रास होत नसावा. त्यांच्या ग्रुपला नियमित येणार्‍या मंडळींना होणारे फायदे उत्साह वाढवणारे आहेत. ही मंडळी सुलभाताईंमुळे आता इतकी तयार झाली आहेत कि ती नवीन पालकांना सल्ला देऊ शकतात, उपाय सुचवु शकतात. पालकांच्या शांत परंतु ठाम वागण्याने मुलांच्यादेखिल वागण्यात फरक पडला आहे. महत्त्वाचे म्हणजे या आजाराच्या बाबतीत पोलिसांचा अनुभव फार चांगला आहे. ते आजाराचे स्वरुप लक्षात घेऊन पालकांना मदत करतात. मुक्तांगणमध्ये व्यसनाच्या भयानकतेबद्दल पाहिले होते. येथे जे पाहिले ते व्यसनापलिकडले वाटले. अगतिक आईवडिल, मुलांमुळे होणारा छळवाद, टोचणारा समाज, आजारावरील मर्यादीत उपचार, ते करण्यासाठी लागणारी मनाची तयारी, आत्यंतिक चिकाटी आणि संयम, आणि हे सारे करत असताना, घराकडे पाहणे, नोकरी धंदा, आर्थिक बाजु सांभाळणे, स्वतःची दुखणी खुपणी, घरातील ज्येष्ठांची काळजी घेणे असे एकंदरीत सर्व बाजुंनी माणसाचा कस पाहणारे असे या समस्येचे स्वरुप आहे. एखादे वादळ यावे आणि त्याने घरदार उध्वस्त करावे असे या आजाराकडे पाहिल्यावर वाटते. वादळावर फारसा उपाय करता येत नाही. मात्र दुर्दैवाने त्याच्याशी झुंजण्याची वेळ आलीच तर आधी स्वतःला खंबीर बनवावं लागतं. सुलभाताई आपल्या ग्रुपमध्ये पालकांना हेच शिकवीत असतात.

अतुल ठाकुर