Archive for the Category » Uncategorized «

गुरुर्बह्मा आणि संशोधनक्षेत्रातील निगरगट्टपणा

आपल्याकडे आपल्या पुर्वजांनी गुरुचं माहात्म्य सांगताना कसल्याही मर्यादा पाळलेल्या नाहीत त्यामुळे गुरु हा प्रकार सोकावलेला असुन त्याची फळं आपल्याला भोगावी लागत आहेत. अगदी पुर्वापारपासुन कुणी आपल्या आवडत्या शिष्यापेक्षा दुसरा पुढे जाऊ नये म्हणुन अंगठा कापुन घेतं, तर कुणी मुलाला जास्त विद्या मिळावी म्हणुन कपट करतं. गुरुची झोपमोड होऊ नये म्हणुन शिष्याने भुंग्याला आपली मांडी पोखरु दिली तर त्याला काय फळ मिळाले? विद्या वापरायच्या ऐनवेळी विसरशील हा गुरुचा शाप. आणि अशा गुरुंच्या नावे गळे काढणारी, त्यांच्या नावाने पारितोषिके देणारी मंडळी नंतर अवतरली. अध्यात्मात आणि कला क्षेत्रात तर गुरुचं नाव घेतल्यावर कान चिमटीत जाणे आणि सद्गदीत होणे हे नेहेमीचेच. कुणी गाणं शिकायला गुरुकडे पाणी भरलं, लाकडं फोडली आणि या कथा कौतुकाने सांगितल्या गेल्या. किंबहुना त्याचमुळे अभ्यास आणि शिक्षण ही अत्यंत कष्टाने, परिश्रमाने साध्य होणारी बाब आहे असे सर्वसामान्यांच्या मनी बिंबले. मात्र हे कष्ट आणि परिश्रम हे अभ्यासावर घ्यावे लागत नसुन गुरुचा बेजबाबदार लहरीपणा सांभाळण्यासाठी घ्यावे लागतात हे संशोधन क्षेत्रात गेल्याशिवाय कुणाला फारसं कळण्याची शक्यता नाही.

सामाजिक शास्त्रे या विषयात हा त्रास वेगळ्या प्रकारचा असतो. विज्ञान विषयात कमीत कमी दोन अधिक दोन चार असं जर शिष्याने म्हटलं तर मनात नसलं तरी गुरुला होकार हा द्यावाच लागतो. मात्र सामाजिक शास्त्राची गोष्ट तशी नाही. इथे मार्क्सचे चाहते आणि विरोधी यांच्यात जुंपलेली असते. त्यामुळे तुमच्या कुठल्याही विधानाला गुरुकडे प्रत्युत्तर असतेच आणि त्याला आवश्यक असा सर्वे देखिल असतो त्यामुळे “चित भी मेरी पट भी मेरा” असा प्रकार असतो. यामुळे होतं काय की साधं सिनॉप्सीस दाखल करायचं झाल्यास गुरुकडे घालाव्या लागण्यार्‍या हेलपाट्यांना कसलाच घरबंध नसतो. गुरु वाटेल तितका वे़ळ शिष्याला छळु शकतो. त्यानंतर अठरा ड्राफ्टनंतर गाईडने सिनॉप्सीस मान्य केला वगैरे गोष्टी फुशारकीने सांगितल्या जातात, आणि काही महामुर्ख शिष्यांना यातदेखिल अभिमान वाटतो.

विभागातले वातावरण राजकारणाने बुजबुजलेले असते. त्यात ज्याच्याकडे जास्त विद्यार्थी त्याची तंगडी वर असा प्रकार असल्याने चांगल्या विद्यार्थ्यांना कळपात ओढण्याचे प्रकार सुरु असतात. गावाकडुन आलेल्या हुशार परंतु इंग्रजीत कमकुवत असलेल्या विद्यार्थ्याचे हाल कुत्रादेखिल खात नाही. नवीन नियमाप्रमाणे अनेक चाचण्यांमधुन पार पड्ण्याचे दिव्य करावे लागते. त्यात मुलाखत नावाचा अत्यंन हिन दर्जाचा प्रकार असतो. तेथुन रडत परत जाणार्‍या विद्यार्थ्यांच्या हकिकती ऐकु येतात. पुढे कोर्सवर्क नावाचा प्रकार सुरु होणार असतो. तो सुरु झाल्यास विद्यार्थ्याने स्वतःला नशिबवान समजावे. कारण हे सहा महिने सक्तीचे असतात. ते सुरु न झाल्यास तुमचा बराच वेळ वाया जाण्याची शक्यता असते. प्राध्यापक मंडळींना स्वतःच्या राजकारणातुन, पुस्तके लिहिण्यातुन, देशोदेशी सेमिनारमध्ये हिंडण्यातुन फुरसत मिळाली तर ते आपला वेळ शिकवण्यास देतात. त्यातुन कोर्स वर्क साठी वेळ काढणे म्हणजे फारच झाले. त्यामुळे जास्त पीएचडी विद्यार्थी जमल्यास वर्ग सुरु करु असा बनिया प्रकार सुरु होतो ज्यात विद्यार्थ्यांचा बराच वेळ, कदाचित एक वर्ष देखिल वाया जातं.

विद्यार्थ्याने स्वत:ला आवडेल तो विषय निवडावा म्हणजे त्याचा संशोधन करण्यातला रस शेवटपर्यंत टिकेल असा प्रेमळ सल्ला गुरुमाऊली देते मात्र विषयाची चर्चा करायला गेल्यावर आपले राहिलेले, अडगळीत पडलेले, प्रोजेक्ट चालु असलेले संशोधन विद्यार्थ्याच्या माथी मारण्याचा भरपुर खटाटोप केला जातो आणि बहुतेक विद्यार्थी त्याला बळी पडतात. कठीण संशोधनात पडुन उगीच डोक्याला ताप करण्यापेक्षा “बिकट वाट वहिवाट नसावी” हे सूत्र कसोशीने पाळले जाते. काही शिष्योत्तम मात्र सोपा विषय निवडण्याच्या मागेच असतात हे देखिल नमुद करायला हवं. हे उभयपक्षी बरे असते.

बर्‍याच गाईडसचा विशिष्ठ तत्वज्ञानाकडे कल असतो. काहींचे, खरं सांगायचं तर सर्वांचे छुपे अजेंडा असतात. दलित विषयाला वाहुन घेतलेले गाईडस तो विषय, विशिष्ठ जाती यांचे हित सांभाळण्यात गुंतलेले दिसुन येतात आणि विद्यार्थ्यांकडुनही तीच अपेक्षा ठेवतात. मार्क्सीस्ट गाईडना तर मार्क्सवर टिका केली कि कुंकु पुसल्याइतकं दु:खं होतं. फेमिनिस्ट प्राध्यापकांची वेगळी चुल असते. तेथे फर्ड्या इंग्रजीचे महत्व जास्त दिसुन येते. फेमिनिझम आणि डायसपोरा याकडे जाणार्‍या विद्यार्थ्यांच्या पेहराव, राहणीमान आणि भाषा यात वेगळेपणा जाणवतो. उच्च वर्णिय किंवा त्याकडे कल असलेल्या प्राध्यापकांची दलित विषयावर ठराविक मते असतात. त्यामुळे काही एक वेगळा विषय घेऊन काम करण्याची इच्छा असणार्‍या विद्यार्थ्यांची कुचंबणा होते. मग काही चलाख विद्यार्थी निघतात. त्यांना अभ्यासात रस नसतो पण पीएचडीत असतो. ते प्राध्यापकांच्या ओल्यापार्ट्यांना बाटल्या आणण्यापासुन ते अगदी गाड्यांची सर्विसिंग करण्यापर्यंत सेवा पुरवणं सुरु करतात. ही मंडळी खुप पुढे जातात, परदेशी दौरे काय मग सर्वच वाटा सुलभ होऊ लागतात.

गाईडचा कडकपणा हा विकृत वाटावा या थराला गेल्याची देखिल उदाहरणे आहेत. खाजगीत झालेल्या गोष्टींचा राग गरीब विद्यार्थ्यांवर काढणे तर नेहेमीचेच. काहीएक उद्देशाने उच्चशिक्षणाकडे वळणार्‍यांना बाहेर चारचौघांना ऐकु जाईल इतक्या जोरात अंगावर खेकसुन ओरडण्यात आपण काही गैर करत आहोत हे या वयाने वाढलेल्या गुरुमाऊलींच्या गावीही नसते. यात अत्यंत दुर्दैवाची गोष्ट ही की हे सर्व रास्त आहे. संशोधन ही अशीच कठीण बाब असते, हे सर्व सहन करावेच लागते असे मानणारी एक षंढ पिढी जन्माला आली आहे. त्यामुळे याबाबत कुठे काहीही बोलता येत नाही. मला माझ्या जेष्ठ स्नेह्यानेअनुभवी आणि प्रेमळ सल्ला दिला होता. तो म्हणाला” तुला पीएचडी करायचंय? मग जर तुझा गाईड म्हणाला अरे माझी पँट फाटलीय. तर तत्काळ सुईदोरा घेऊन, आत्ता शिवुन देतो साहेब असं तु म्ह्णु शकलास तरच तुला पीएचडी करता येईल”.

अर्थात याला सन्माननीय अपवाद आहेतच. विद्यार्थ्याला चहा बनवुन देणारे, त्याच्या पायाची जखम स्वतः औषध लावुन बांधुन देणारे, इंग्रजी न आल्यास त्याला मदत करणारे, स्वतःच्या संगणकावर विद्यार्थ्याचे सिनॉप्सीस डीझाईन करणारे, संशोधनाच्या दरम्यान अडचण आल्यास विद्यार्थ्याला सर्व प्रकारची मदत करणारे, वैयक्तीक बाबीत सल्ला देण्याइतकी जवळीक साधणारे, थोडक्यात प्रेमळ पित्याची भुमिका निभवणारे देखिल गाईड सुदैवाने पाहायला मिळाले आहेत. पुलंचे चितळे मास्तर हे मला पुलंच्या बटाट्याच्या चाळीइतकेच अपवादात्मक वाटतात. मात्र पुलंचेच एक विधान संशोधन क्षेत्रात बरेचदा चपखल लागु पडते. गुरुबीन कौन बतावे वाट्…गुरुशिवाय कोण वाट लावणार????

अतुल ठाकुर