Blog Archives

एक अनामिक यक्ष – रसभारती – ३

कश्चित्कान्ताविरहगुरुणा स्वाधिकारात्प्रमत्तः
शापेनास्तङ्गमितमहिमा वर्षभोग्येण भर्तु: |
यक्षचक्रे जनकतनयास्नानपुण्योदकेषु
स्निग्धच्छायातरुषु वसतिं रामगिर्याश्रमेषु ||१||

“कश्चित” शब्दाचे आणखी एक वैशिष्ट्य सांगता येईल ते कथनशास्त्राच्या (Narratology) संदर्भात. या शास्त्रानूसार “अनामिकता” हा एक महत्त्वाचा भाग कथनात असु शकतो. कालिदासाने यक्षाबद्दल काहीही सांगितले नाही. मेघदूतात तो अनामिक आहे. त्यामुळे तो विश्वव्यापक देखील आहे. ही विश्वव्यापकता या “कश्चित” मुळे साधते. दुसरे म्हणजे सार्वकालिकता सुद्धा कश्चितमुळे निर्माण होते.

नाव गाव माहित नसलेल्या या यक्षाचे सुख, दु:ख, वेदना, हुरहुर, पश्चात्ताप, आठवणी, व्याकुळता या सार्‍या जगाच्या कानाकोपर्‍यातील कुठल्याही वाचकाच्या होऊन जातात. या अनामिकतेमुळे “मेघदूत” हे देश, कालाची बंधने ओलांडून पलिकडे निघून जाते. कुठल्याही देशातील, कुठल्याही कालातील, आपल्या आवडत्या स्त्रीपासून वियोग झालेल्या पुरुषाला मेघदूतातील यक्षाची व्याकुळता ही स्वतःचीच वाटू शकते.

ही देश, काल, धर्म, जाती, वर्ग या पलिकडे काव्याला नेण्याची किमया महाकवि कालिदासाने फक्त एका “कश्चित” शब्दाने साधली आहे.

अतुल ठाकुर